नागपूर: महाल दंगलीतील संशयित आरोपी फहमी खान यांच्या घरावर मनपाने निष्काळजीपणे बुलडोझर चालवल्याने संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. ही कारवाई रविवारी सकाळी अचानक करण्यात आली. मनपा अधिकाऱ्यांनी फक्त २४ तासांचा अल्टिमेटम देत घर खाली करण्याचे आदेश दिले होते, मात्र घरात राहणाऱ्या कुटुंबाने असा दावा केला की, हे घर फहमी खान यांच्या नावावर नव्हते, तरीही मनपा अधिकाऱ्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय कारवाई केली.
बिनधास्त कारवाईमुळे गरीब कुटुंबाची फरफट-
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्यांनी मनपा अधिकाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे. पंधरा दिवसांचा वेळ द्यायला हवा होता, मात्र केवळ एका नोटिशीवर संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आले. या प्रकरणात मनपा उपायुक्त सुनील गजभिये, अधिकारी हरीश राऊत आणि सरपाते यांची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी-
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशाशिवाय अशी कारवाई बेकायदेशीर असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे मनपा प्रशासनाच्या हुकूमशाही कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.नागरिकांचा आरोप आहे की, यापुढेही अशी कारवाई करण्यात आली तर ती लोकशाहीच्या तत्वांना हरताळ फासणारी ठरेल. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.