नागपूर :प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला स्नान करण्यापूर्वी संगम नाक्यावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यामुळे तिथे गोंधळ उडाला. ताज्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ३० जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विरोधकांनी हा आकडा खोटा असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत आपले म्हणणे मांडत असताना चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृत्यूंच्या आकडेवारीबाबत शंका उपस्थित केली.
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या हजारो लोकांना श्रद्धांजली, असे विधान खरगे यांनी केले.यानंतर संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला.राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक चकमकही झाल्याचे पाहायला मिळाले.
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला? या घटनेतील सत्य आकडेवारी समोर येत नाही, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला जाब विचारला. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. पण हे चुकीचे असेल तर मला सत्य सांगा. या घटनेतील मृतांच्या आकडेवारीबाबत सत्य काय आहे ते सांगा. या घटनेत अखेर किती जणांचा मृत्यू झाला? यात सत्य काय आहे? एवढी तरी माहिती तरी द्या, माझी चूक असेल तर मी माफी मागतो असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले. यानंतर सभापती जगदीप धनखड यांनीही मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले.
धनखड यांनी खरगे यांना संसदेत केलेले विधान मागे घेण्याची विनंती केली. खरगे यांनी सभागृहात ‘हजारो’ या शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे. आपण निदान सभागृहात तरी असे विधान करू नये, असे धनखड म्हणाले.
दरम्यान महाकुंभमेळ्याच्या इतिहासात, प्रचंड गर्दीमुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरीचा मोठा इतिहास आहे. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० लोक मृत्युमुखी पडले. तर ६० जण जखमी झाले. मात्र ही आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.