नागपूर : एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा उल्लेख केला जात असला तरी शहरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विकासाच्या नावावर शहरात ठिकठिकणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्ता निर्मितीचे व्यवस्थित नियोजन नाही. कुठलाही रस्ता कधीही खोदलेला दिसतो. कोणता रस्ता कधी पूर्ण करावयाचा, कंत्राटदार कोण आहे याची कुठलीही माहिती नसल्याने नागपूरकरांच्या संतापात भर पडत आहे.
अनेक ठिकाणी तर पूर्वसूचनेशिवाय रस्ताच खोदून ठेवल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शहरात चौफेरच अशी स्थिती आहे. याप्रकरणी ‘नागपूर टुडे’च्या टीमने नागरिकांशी संवाद साधत त्यांचा समस्या जाणून घेतल्या. वंजारी नगर,धंतोली गार्डन, ओंकार नगर अशा प्रमुख परिसरात नाली टाकण्याच्या कामासाठी चांगले रस्ते तोडण्यात आले आहे. रस्त्यांचे कामेही संथ गतीने सुरु आहेत. या कामांचे कोणतेही पूर्व नियोजन नाही. तसेच नागरिकांना यासंददर्भात कोणतेही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. मनपाच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
रस्त्यांची उघड झालेली परिस्थिती केवळ ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधांवरच प्रकाश टाकत नाही तर नागपूर महानगरपालिकेची (NMC) निष्काळजी वृत्ती देखील अधोरेखित करते. योग्य व्यवस्थापन आणि देखभालीच्या अभावामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रस्त्यांच्या ढासळलेल्या पायाभूत सुविधांवर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. रस्त्यांची सद्यस्थिती केवळ सार्वजनिक सुरक्षेलाच धोका निर्माण करत नाही तर राज्यातील एक महत्त्वाचे शहरी केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीच्या प्रतिष्ठेलाही कलंकित करते.