नागपूर : दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे आंबेकडर अनुयायांनी आक्रमक पवित्रा घेत बांधकामाची तोडफोड केली.याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) नागपूर शहर अध्यक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या एकूण १५ जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीक्षाभूमी येथे झालेल्या हिंसक आंदोलनाबाबत नागपूर पोलिसांनी बजाज नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यात बांधकाम साहित्याची तोडफोड आणि आग लावण्याच्या प्रकारचा समावेश आहे. . एका कार्यकर्त्याने उत्खनन यंत्र हलवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला रोखले. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नागपूर अध्यक्ष रवी शेंडे यांचे नाव आहे. याशिवाय अन्य अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दीक्षाभूमी येथील घटनेत सहभागी असलेले अनेक जण नागपूरबाहेरील असल्याचे तपासात समोर आले आहे. नागपूरच्या पोलीस उपायुक्त अस्वती दोरजे यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान जनभावनेला प्रतिसाद देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीने सर्व बांधकाम उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतचे औपचारिक पत्र जारी केले. हा मुद्दा विधानसभेतही गाजला, तिथे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू असलेल्या बांधकामांना तातडीने स्थगिती देण्याची घोषणा केली.