पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला पैशांअभावी उपचार न दिल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणावर आता राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकाराची तीव्र निंदा करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ही घटना अतिशय गंभीर आहे. गरीब रुग्णांना सेवा न देणे ही माणुसकीला काळिमा फासणारी बाब आहे. अशा चुकीला माफ करता येणार नाही. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि दोषींना शिक्षा होणारच.
तसेच, रुग्णालयात जर प्रशासनाचा मुजोरपणा असेल तर तो सहन केला जाणार नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह याची गांभीर्याने दखल घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे यांनी सांगितले की, रुग्णाच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मागितल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या रुग्णालयाला याआधी सरकारकडून मदत दिली आहे. पण जर ही मदत जनतेच्या हितासाठी वापरली जात नसेल, तर आम्ही कठोर पावले उचलू, असेही ते म्हणाले.
या प्रकरणामुळे जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून सरकारवर दबाव वाढला आहे. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन केला जाणार नाही,असा पुनरुच्चार करत बावनकुळे यांनी दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली.