मुंबई : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु असताना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. पदरचनेतील शुक्ला यांच्या नंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रश्मी शुक्लांच्या बदली आदेशांनंतर आता नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या आदेशांनुसार, तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल गठित करून त्यांच्याकडे नव्या नावाबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पॅनल आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला जाणार असून त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांच्या नावाची घोषणा केली जाईल.
विरोधकांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाची कारवाई –
रश्मी शुक्ला यांच्यावर याआधीही देवेंद्र फडणवीसांच्या आदेशांनी विरोधकांचे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत संजय राऊत, नाना पटोले व इतर विरोधी नेत्यांकडून अजूनही फोन टॅपिंग केले जात असल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर केले होते. त्यानंतर आता त्यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केल्यामुळे त्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.