नागपूर : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नागपुरातील संघ मुख्यालयाला भेट देत तेथील परिसराचा आढावा घेतला. पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रश्मी शुक्ला सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी संघ मुख्यालयात आढावा घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि हेडगेवार स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
संघ मुख्यालयात जाणाऱ्या त्या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या. नागपूरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे देखील सांगितले जाते. संघ मुख्यालय हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचादेखील प्रयत्न झाला होता. सद्य:स्थितीत संघ मुख्यालयात केंद्रीय यंत्रणांची सुरक्षा असली तरी ‘पीएफआय’कडून असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचे कडे वाढविले आहे. संघ मुख्यालयाची सुरक्षा ही पोलिसांसाठी प्राथमिकता आहे.
दरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कालावधी लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे आता शुक्ला या ३ जानेवारी २०२६ पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक राहतील. निवृत्तीला सहा महिने असताना दोन वर्षांचा कालावधी मिळविणाऱ्या शुक्ला या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. राज्य शासनाने याबाबतचा आदेश मंगळवारी जारी केला.