Published On : Mon, Mar 11th, 2024

विदेश व्यापार संचालनालय- डीजीएफटी नागपूर कार्यालयाच्या वतीने 12 मार्च रोजी निर्यात महोत्सवाचे आयोजन

Advertisement

नागपूर : केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गतविदेश व्यापार संचालनालय- डीजीएफटी, नागपूर या कार्यालयाच्या वतीने उत्तर नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निर्यात महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. विदेश व्यापार संचालनालय नवी दिल्लीचे महासंचालक संतोष कुमार सारंगी, (भाप्रसे) या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षीय भाषण करणार असून याप्रसंगी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, नागपूर क्षेत्राच्या डाक महाअधीक्षक शोभा मदाळे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे अतिरिक्त विदेश व्यापार संचालनलयाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.व्ही.श्रमण यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी डीजीएफटी, नागपूरच्या अतिरिक्त महासंचालक स्नेहल ढोके उपस्थित होत्या.

नागपूर शहरात पहिल्यांदाच आयोजित होणा-या या निर्यात महोत्सवामध्ये इंडिया पोस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, वन विभाग, पर्यटन विभाग, वनामती, कृषी विभाग, फलोत्पादन विभाग, माविम, आदिवासी विकास विभाग नागपूर, निर्यात प्रोत्साहन परिषद, कृषी प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अपेडा, स्पाइसबोर्ड, अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषद-इइपीसी, भारतीय रेशीम निर्यात प्रोत्साहन परिषद त्याचप्रमाणे ॲमेझॉन ग्लोबल यांसारख्या संस्थांचा समावेश राहणारआहे.

Advertisement

महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश, तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 49 जिल्ह्यांमधून कृषी आणि फलोत्पादन उत्पादने, लघु वन उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, फार्मा उत्पादने, प्लास्टिक उत्पादने, संरक्षण उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाणी आणि खनिज यांची निर्यात वाढवणे हा या निर्यात महोत्सवाच्या आयोजना मागील हेतू आहे. या कार्यक्रमात, विदेश व्यापार संचालनालयाचे अधिकारी आणि इतर संस्था आयात आणि निर्यात प्रक्रिया आणि योजना आणि दस्तऐवजीकरण यावर सविस्तर माहिती देतील.

जिल्ह्यांतील- एक जिल्हा एक उत्पादन-ओडीओपी उत्पादने तसेच निर्यात क्षमता असलेली इतर उत्पादने या कार्यक्रमात स्टॉल्सवर प्रदर्शित केली जातील. शेतकरी उत्पादक संघटना एफपीओ उद्योग संघटना, उद्योजक, महिला बचत गट हस्तशिल्प कारागीर आणि विविध औद्योगिक संघटनांच्या सदस्यांना या निर्यात महोत्सवात सहभागी होवून विदर्भ प्रदेशातून निर्यातीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तसेच आयात आणि निर्यातीची गतिशीलता समजून घेण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्यासाठी विदेश व्यापार संचालनालय नागपुरद्वारे आवाहन करण्यात आले आहे.