नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे.दोन्ही नेते खुर्चीसाठी आपसात भांडत आहेत. दोघांची वाट चुकली तर ते एकमेकांना फाडून खातील,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी मंगळवारी केला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
विदर्भ आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावरच चर्चा सुरू आहे. दोघेही एकमेकांशी अजिबात सहमत नाहीत. तिकीट वाटपावरुनही दोघांमध्ये खडाजंगी आहे. याउलट भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने राज्यातील जनतेला चांगले सरकार दिले असल्याचेही देशमुख म्हणाले.
विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले हे दोघेही केवळ खुर्चीची स्वप्ने पाहत आहेत. या दोघांमधील मतभेदांची चर्चा विदर्भाच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.राज्यातील महिलांना न्याय देण्यासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण योजना’ आणली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारने मदत जाहीर केली. प्रत्येक शेतकऱ्याला वीज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे पहाता महायुतीचे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची टीका आशिष देशमुख यांनी केली.