नागपूर : माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेता रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेने पूनम अर्बन सोसायटीत झालेल्या ३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्याच्या तब्बल ६ वर्षांनी छोटू भोयरला अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलीस राजकीय दबावात-
आरोपी भोयरच्या अटकेनंतर नागपूर पोलीस दबावात असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण ज्या पोलीस अधिकाऱ्याने भोयरला अटक केली त्यांच्याकडून सध्या या प्रकरणाचा तपास काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पूनम अर्बन सोसायटीत झालेल्या कोट्यवधी घोटाळ्याव्यतिरिक्त छोटू भोयर नागपूर महानगर पालिकेत उपमहापौर असताना अनेक घोटाळे केल्याचे उघडकीस आले आहे. असे असतानाही त्यांना तब्बल सहा वर्षानंतर अटक झाल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
भोयरला अटक करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) रिजवान शेख यांच्याकडून आता याप्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मनोबल खचले असून पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव असल्याची चर्चा सुरु आहे.
भोयरच्या पीसीआरचा कार्यकाळ आज संपणार –
२२ जानेवारीला बुधवारी सकाळी मुंबईवरून परतल्यानंतर छोटू भोयर यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी ८ ते १० आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती आहे. आज छोटू भोयरच्या पीसीआरचा कार्यकाळ संपला असून सायंकाळी न्यायालय यानंतर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छोटू भोयर यांचा नासुप्रचे ट्रस्टी असतानाचा कार्यकाळ चर्चेत –
छोटू भोयर यांचा नासुप्रचे ट्रस्टी असतानाच्या कार्यकाळात जगनाडे चौकात ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या नावाखाली भव्य अशी व्यावसायिक इमारत बांधण्यात आली. सूत्रानुसार, ही इमारत बांधण्यापूर्वी या नासुप्रच्या २ एकर जागेवर जगनाडे चौकातील हॉकर्ससाठी व्यवसायिक गाळे उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली. हॉकर्सचे नाव पुढे करून कार्यकर्त्यांकडून फॉर्म भरून घेण्यात आले. मात्र नंतर याठिकाणी हॉकर्सना गाळे देण्यात आलेच नाही. मात्र, येथे हॉकर्सला व्यावसायिक गाळे उपलब्ध करून न देता त्याठिकाणी ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या नावाखाली भव्य अशी हॉटेल, रुग्णालयासाठी व्यावसायिक इमारत बांधण्यात आली.दुसरीकडे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत आरोपी छोटू भोयर हे पूनम सोसायटीचे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात २६ लोकांच्या नावावर बनावट कागदपत्र तयार करून ३३ लाखांचे बोगस कर्ज प्रकरणे मंजूर केल्याची धक्कादायक बाब समोर आली.