नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर दावे -प्रतिदावे करण्यात येत आहे.
नागपूर शहरातील जागावरून महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला दावा बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपावर चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माजी मंत्री अनिल देशमुख हे निवडणूक लढणार याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम मतदारसंघावर दावासुद्धा केला नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत बैठक नाही –
महाविकास आघाडीची एक बैठक 27 ऑगस्टला ठेवण्यात आली होती. मात्र, आमचे खासदार वसंत चव्हाण यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख कळेल तेव्हा जागा वाटपांच्या चर्चेला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सात राज्यात पैशानेच भाजपने सत्ता मिळवली –
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा भाजपचा धंदा आहे. सात राज्यात पैशानेच भाजपने सत्ता मिळवली आहे. घर फोडा पक्ष फोडा हा त्यांचा धंदा आहे. मात्र, त्यांचेच केंद्रातील सरकार कुबड्यांवर सुरू आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुपाऱ्या फेका, नारळ फेका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सकल हिंदू समाजाच्या मोर्चांच्या माध्यमातून भाजप मतांचे राजकारण करीत आहे. धर्मात तेढ निर्माण केले जात आहे. उद्रेक होईल असे भाषण केले जात आहे, असे सांगून वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.