शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांच्या हस्ते प्रदान
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या संजय नगर माध्यमिक शाळा व डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेच्या पाठोपाठ गुरूवारी (ता.३०) विवेकानंद नगर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ई-टॅबलेटचे वितरण करण्यात आले. मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते इयत्ता दहावीच्या ४७ विद्यार्थ्यांना टॅबलेट प्रदान करण्यात आले. बुधवारी (ता.२९) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते संजय नगर माध्यमिक शाळा व डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ई-टॅबलेट देण्यात आले.
विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्यासह क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, नगरसेवक लखन येरवार, नगरसेविका वनिता दांडेकर, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, शाळेचे मुख्याध्यापक (माध्यमिक) नितीन भोळे, मुख्याध्यापिका (प्राथमिक) प्रेमलता यादव, प्रदीप चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शिव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या २९ माध्यमिक आणि ४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे दोन हजारावर विद्यार्थ्यांना ई-टॅबलेटचे वितरण करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील पाच वर्षांपासून शिक्षण समितीचा सभापती म्हणून जबाबदारी सांभाळताना मनपाच्या शाळेत शिकणा-या गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यादृष्टीने नेहमी प्रयत्न केला. यामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाशी जोडून त्यांना शिक्षण मिळावे यादृष्टीने टॅबलेट वितरणाची संकल्पना पुढे आली. यामध्ये अनेक प्रशासकीय अडथळे आले असता ते दूर करून आज विद्यार्थ्यांना ते वितरीत होत आहेत. राज्यात मुंबई महानगरपालिका वगळता कोणत्याही मनपाने विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले नाही. आज नागपूर महानगरपालिका विद्यार्थ्यांना टॅब देणारी मुंबई वगळता पहिलीच महानगरपालिका ठरली असल्याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब त्यांना त्यांच्या ऑनलाईन शिक्षणासह ऑनलाईन व्यवहार ज्ञानामध्ये भर पाडण्यास उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही प्रा. दिलीप दिवे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या भीषण संकटात मनपाच्या शिक्षकांनी कधी ऑनलाईन तर कधी घरी जाउन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच मनपाच्या शाळा पुढे प्रगती करीत आहेत, असे प्रतिपादन यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी श्यामकुळे यांनी केले.
शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी विद्यार्थ्यांना टॅबलेटच्या संदर्भात माहिती दिली. टॅबलेट सोबतच विद्यार्थ्यांना दर महिन्याला ३० जीबी इंटरनेट डेटा नि:शुल्क देण्यात येणार आहे. टॅबमध्ये शिक्षकांद्वारे अभ्यासक्रम आणि इतर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे ‘संदेश’ हे विशेष ॲप असून यामध्ये शैक्षणिक वगळता अन्य ॲप प्रतिबंधित करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि शाळांसाठी मनपाने घेतलेला हा मोठा पुढाकार असून आता प्रत्येकच शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाने आता आपली जबाबदारी अधिक जोमाने उचलून मनपाच्या शाळांचा दर्जा आणखी उंचाविण्यास कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना बालेकर यांनी केले. आभार दिवाकर मोहितकर यांनी मानले. याप्रसंगी शाळेचे नीता गडेकर, मीना पोतदार, संध्या भगत, मोहसीन खान, निर्मला माकडे, राजकुमार बोंबाटे आदी शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते.