शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांच्या हस्ते प्रदान
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिवणगाव मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता.१) ई-टॅबलेटचे वितरण करण्यात आले. मनपाद्वारे यापूर्वी संजय नगर माध्यमिक शाळा, डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा व विवेकानंद नगर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ई-टॅबलेटचे वितरण करण्यात आले. शुक्रवारी शिवणगाव शाळेतील ३० विद्यार्थ्यांना मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते टॅबलेट प्रदान करण्यात आले.
मनपा शिवणगाव प्राथमिक शाळेतील कार्यक्रमात शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्यासह क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेविका प्रणिता शहाणे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा डेबुवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अर्चना बोडे, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ज्ञ दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरळीत शिक्षणासाठी ई-टॅबलेटचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी मनपाच्या शिक्षकांद्वारे ऑनलाईन सोबतच विद्यार्थ्यांना घरी जाउनही शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांचे दहावीचे वर्ष हे महत्वाचे वर्ष आहे. अशात त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलिही बाधा येउ नये. ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची वेळ आल्यास त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी मनपाद्वारे ई-टॅबलेटसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण मनपाद्वारे करण्यात आले असून त्यासाठी लागणा-या इंटरनेट डेटाची व्यवस्था सुद्धा मनपाने केली आहे. दर महिन्याला विद्यार्थ्यांना ३० जीबी इंटरनेट डेटा नि:शुल्करित्या पुरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन राकेश दुंपलवार यांनी केले. आभार उदय जुमडे यांनी मानले.