नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उष्माघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गर्दर्शनात मनपातर्फे हिट ऍक्शन प्लॅन २०२२ तयार करण्यात आलेला आहे. या अंतर्गत रामनवमी निमित्त रविवारी (ता. १०) गांधीबाग, लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये नागरिकांना उष्माघात प्रतिबंधक माहिती पत्रकांचे वितरण करण्यात आले.
सदर पत्रकांचे वितरण मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोन मध्ये झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तिवारी, लक्ष्मीनगर झोन मध्ये झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे आणि धरमपेठ झोन मध्ये झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.
या पत्रकात उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात काय करावे, काय करू नये याबाबत विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आकस्मिक आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. अशाच प्रकारची मोहीम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त १६ एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे. अशी माहिती हिट ऍक्शन प्लॅन २०२२ चे प्रमुख सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी दिली.
या दिवसात हे करा
– भरपूर थंड पाणी प्या.
– ताक, आंब्याचा पन्हा, नारळ पाणी प्या.
– सैल व फिक्कट रंगाचे सुटी कपडे घाला.
– थंड जागेत/वातावरणात रहा.
– अत्यावश्यक काम असल्याशिवाय दुपारी घराबाहेर जाऊ नका.
– बाहेर जाताना डोक्यावर रुमाल किंवा टोपी घाला.
हे करू नका
– मद्य, सोडा, कॉफी पिणे टाळावे.
– गरज नसताना उन्हात बाहेर जाऊ नये.
– फिट्ट व गडद कपडे घालू नका.
– अती शरीर कष्टाची कामे करू नका.
– उन्हाचा त्रास मला होत नाही असं समजू नका.