नागपूर : सध्या संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोविड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. नागपूरच्या जनतेच्या सुरक्षेसाठी अविरत आपली जबाबदारी बजाविणारे पोलिसकर्मी, आशा वर्कर, सफाई कामगार यांचे स्वास्थ्य निरोगी राहावे व रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने आयुष्य मंत्रालयाने प्रामाणिक केलेल्या होमिओपॅथ रोगप्रतिकारक बूस्टर औषधी कोविड योद्ध्यांना वितरित करण्याकरिता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना ८००० औषधी बॉटल्स सुपूर्द करण्यात आल्या.
कोरोना या आजाराशी झुंज ही दीर्घकाळ चालु शकते. याकरिता आयुष विभागाने सुचविलेल्या जीवन पध्दतीत बदल, घरीच घेता येणारी औषधे व रोग प्रतिकारशक्ती वाढवून आपण कोविड-१९ सारख्या आजारावर विजय मिळवू शकतो असा विश्वास आंतरभारतीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डॉ.प्रशांत भारबत यांनी सांगितले.
सदर होमिओपॅथ रोगप्रतिकारक बूस्टर औषधी आंतर भारतीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, धाबा यानी ऑरेंज सिटी होमिओपॅथिक असोसिएशन नागपूर व आयएमएचआरआर स्वयंसेवी संस्था नागपूर यांच्या सहकार्याने मदत कार्य म्हणून करण्यात येत आहे. सदर औषधी नागपुरातील कोविड योद्धाना वितरित करण्यात येत आहे.
या प्रसंगी डॉ. प्रशांत भारबत, डॉ. मनिष पाटील, डॉ. कैलाश सहारे, डॉ. प्रशांत दिगरसे, डॉ. पंकज निमजे व डॉ. अरुण धारसकार प्रामुख्याने उपस्थित होते.