नागपूर : कोरोनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर अशा बालकांची काळजी व संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, महिला व बाल विकास उपायुक्त भागवत तांबे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सचिन जाधव, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, चाईल्ड लाईनच्या शहर समन्वयक श्रीमती श्रध्दा टल्लू आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी. जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळविण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले की, अशा बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार आहे. अशा निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून अशा बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व जिल्हा प्रशासन संरक्षणासोबतच समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास अशा बालकास बालगृहामध्ये दाखल करुन घेण्यात येणार आहे. यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 यावर सुध्दा संपर्क साधता येईल. कोविड रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणारे बालगृहे, निरीक्षण गृहे यांच्यामार्फत तात्काळ उपचार पुरविण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकसुध्दा नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिली.
कोरोना संसर्ग झाल्यामुळे विलगीकरणात राहत असलेल्या तसेच दवाखान्यात दाखल केल्यामुळे बालकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अशा बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्यामुळे संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. अशा बालकांसाठी एक शिशुगृह तसेच 18 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती कोविड हॉस्पीटल व मदतकेंद्रांना सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे मदत उपलब्ध करुन देणे सुलभ झाले आहे. अडचणीत सापडलेल्या पालकांबाबत संबंधित रुग्णालयाने तात्काळ माहिती कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
तत्पूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.
कोरोनामुळे आई आणि वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आला आहे, अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करीसारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अशा बालकांची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवावी. अशा बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील, यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
या संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या 0712-256991 यावर संपर्क साधावा. या बैठकीस महिला व बाल कल्याण संदर्भात कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.