सखी वन स्टॉप सेंटरचा वर्धापनदिन
नागपूर: घटस्फोटाची प्रकरणे ही समुपदेशन, समन्वय, सहकार्य व सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून सोडवून कुटुंब जोडण्याचे काम करण्यात यावे. यातून यश मिळाले नाही तर शेवटी कायदेशीर पध्दती अवलंबिता येतात. तसेच या प्रकरणांचे निर्णय 2 ते 3 सुनावण्यांमध्ये व्हावे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भारतीय स्त्री शक्तीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. या केंद्राच्या संस्थापिका श्रीमती निर्मला आपटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना.गडकरी म्हणाले- स्त्री पुरुष समानता स्थापन करून जात, पंथ, भाषा, लिंग या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वाना समान न्यायाचा अधिकार मिळावा, यावर आपला देश पुढे जावा, अशी आमची कटिबध्दता आहे.
असे असले तरी सामाजिक जीवनात ताणतणाव, संघर्ष निर्माण होतात. हे विवाद सोडवले जावू शकतात. मध्यस्थी योग्य असली तर प्रश्न सुटतात. सामोपचार, समन्वय व सकारात्मकतेने आणि योग्य मध्यस्थी असेल तर प्रश्न सुटतात. ज्या महिलांवर अन्याय होतात, त्यांना सहारा देऊन मानसिक दृष्ट्या त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम आपण करता ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- घटस्फोटाची प्रकरणे सरकारी यंत्रणेकडे सोडविण्यासाठी गेल्यानंतर कायद्यात ‘टाईम’ नावाची मर्यादा कुठेच नाही. त्यामुळे दीर्घकाळ ही प्रकरणे सरकारकडे चालतात. योग्य समुपदेशन, योग्य आणि वेळेत निर्णय हे महत्त्वाचे आहे. भांडणाने प्रश्न सुटत नाहीत. समुपदेशन आणि समन्वयानेच हे प्रश्न सुटावेत. सकारात्मकता निर्माण करून कुटुंब जोडण्याचे काम या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.
घटस्फोटांच्या प्रकरणात 2 ते 3 सुनावण्यात निर्णय शक्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- वेळेत आणि पारदर्शक निर्णय घेण्याची प्रक्रिया या प्रकरणांमध्ये असावी. मध्यस्थांची दुधात साखर टाकण्याची भूमिका असावी. कौटुंबिक प्रकरणांमध्ये उशीर करणे योग्य नाही. या प्रकरणांचे निर्णय लवकर झाले तर दोन्ही कुटुंबांचे आयुष्य चांगले होईल, असा विश्वास आहे.
प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कौशल्य असतेच. महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नंतर मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत केले, तर त्यांचे जीवन चांगले होईल. अन्यायग्रस्त महिलेला आपल्या पायावर उभे करणे, भविष्यातील पिढीवर चांगले संस्कार करणे, यातून मूल्याधिष्ठित जीवनपध्दती, शिक्षणपध्दतीच्या आधारावर समाजाची निर्मिती करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे शेवटी ना. गडकरी म्हणाले.