नागपूर – दिव्यांग पार्क ही एक अफलातून संकल्पना आहे. उज्जैन येथे अशाप्रकारचा पार्क मी बघितल्यानंतर नागपुरातील दिव्यांगांसाठी देखील त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे, असे मला वाटले. आज नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून अतिशय सुरेख असा दिव्यांग पार्क साकारला आहे. दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला आनंद देणारे आहे. याठिकाणी दिव्यांगांना आनंद देणाऱ्या, त्यांची करमणूक करणाऱ्या तसेच विविध कौशल्यांना व्यासपीठ देणाऱ्या सुविधा उपलब्ध असून नागपुरातील हा पार्क जागतिक आकर्षण ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला.
पूर्व नागपूरमधील सूर्य नगर येथे दिव्यांगांसाठी साकारण्यात आलेल्या अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्कचे लोकार्पण ना. श्री. नितीन गडकरी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कळमना मार्गावरील नैवेद्यम इस्टोरिया सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त अश्या दिव्यांग पार्कचा फायदा नागपुरातील दिव्यांगाना होणार आहे. नागपूरमध्ये दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या शाळा तसेच संस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांना दिव्यांग पार्कमध्ये आणण्याचे आवाहन करावे. भविष्यात या पार्कच्या देखभालीसाठी तज्ज्ञ एजन्सी नेमण्यात यावी.’ येत्या काळात दिव्यांगांसाठी विशेष स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. श्री. गडकरी यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे, डॉ.पंकज मारू, आर्किटेक्ट रितेश यादव आणि कंत्राटदार संजय कुलकर्णी यांच्या सहकार्याने दिव्यांग पार्कचे काम झाल्याचा उल्लेखही ना. श्री. गडकरी यांनी केला.
असा आहे दिव्यांग पार्क
दिव्यांग पार्कमध्ये फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, क्लासरूम, वॉटर इक्विटी झोन, दृष्टिहिन लोकांसाठी स्पर्शिका मार्ग, श्रवणदोष असलेल्यांसाठी सांकेतिक भाषा निर्देशक आणि ब्रेल लिपी मधील नामांकन व चिन्ह यांचा समावेश आहे. तसेच नक्षत्र वाटिका, झायलोफोन आणि पक्षांच्या आवाजातील संगीत थेरपी, ब्रेल बुद्धिबळ, दिव्यांगांसाठी रबर फ्लोरिंग वर खेळांची उपकरणे आणि ओपन जिम अशा विविध सुविधा असल्याची माहिती ना. श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
दिव्यांगांना मुख्य धारेत आण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिव्यांगांना मुख्य धारेत आण्यासाठी विविध प्रकारच्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून तसेच नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रयत्नांमधून हा अतिशय सुरेख असा दिव्यांग पार्क नागपुरात साकारला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्येही दिव्यांगांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व नागपुरातील दोन भुयारी मार्गांचे भूमिपूजन
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पूर्व नागपुरातील दोन भुयारी मार्गांचे भूमिपूजन आज झाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या इतवारी आणि कळमना रेल्वे स्थानकांदरम्यान तसेच नागपूर ते कळमना रेल्वे स्थानकादरम्यान अशा दोन भुयारी मार्गांचा यामध्ये समावेश आहे. पहिला मार्ग शांतीनगर, हनुमाननगर, डिप्टी सिग्नल व लकडगंज या परिसरांना जोडेल. तर दुसरा मार्ग जामदारवाडी, किनखेडे-लेआऊट, शांती नगर या परिसरांना जोडणारा असेल.