नागपूर:दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. या काळात सर्वत्र रोषणाई पाहायला मिळते. हिंदू धर्मात दिवाळीला अधिक महत्त्व आहे. दिवाळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त हा दोन दिवसांचा असणार आहे. 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
नागपुरातील बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाश कंदिल, देवीच्या आकर्षक मूर्ती, पणत्या, विविध प्रकारची रांगोळी, रांगोळी काढण्याचे साचे, लहान मुलांच्या बंदुका, विविध प्रकारचे फटाके, सुगंधी उटणे अशा अनेक साहित्यांनी सजली आहे. दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच बाजारपेठेत नागरिक दिवाळी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. यामुळे व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या दुकानात दिवाळीत लागणार्या साहित्यांचा माल भरला आहे. शहरातील विविध बाजारपेठेत नागपूरकरांनी साहित्य खरेदीसाठी गर्दी केली.