नागपूर: नाले सफाई कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिला.
नागपूर महानगरपालिकेद्वारे नाले व नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका पदाधिकाऱ्यांचे पाहणी दौरे धडाक्यात सुरू आहे. शनिवारी सकाळी त्यांनी म्हाडा कॉलनी, भरतवाडा येथील नागनदीची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. गंगाबाग, शिवशंभो नगर येथील नाल्याची पाहणीही यावेळी केली.
नदीचे प्रवाह मोकळे करून त्याला वाहते करा, जेणेकरून पावसाचे पाणी ओसंडून वाहणार नाही व वस्तीत शिरणार नाही, नाल्याच्या सभोवताल असेलेले गाळाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश यावेळी पार्डीकर यांनी दिले. गंगाबाग पुलाजवळील नदीच्या मार्गात नासुप्रने अनधिकृत भिंत बांधलेली आहे, त्याला त्वरित तोडण्याचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना दिलेत.
पावसाळ्यात नदी, नाले भरून वाहू लागतात. त्याला संरक्षक भिंत नसल्यामुळे पाणी घरात शिरते, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असता पावसाळ्य़ापूर्वी त्याचा बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.नाल्याभोवती व नदी भोवतालच्या संरक्षक भिंतीची डागडुजी करून त्याला पक्के करा,असेही आदेश त्यांनी दिले. स्थानिक नागरिकांच्या समस्या यावेळी पार्डीकर यांनी जाणून घेतल्या. तेथील नागरिकांना त्रास होत आहे. या नाल्यांमध्य़े जमा झालेला गाळ, कचरा मोकळा करून त्याला मोकळे करा, त्याचप्रमाणे नागरिकांना भविष्यात अडचण होऊ नये म्हणून त्याची तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश कार्यकारी महापौर पार्डीकर यांनी दिले.नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अतिक्रमण त्वरित हटवावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या तक्रारीकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पार्डीकर यांनी जाब विचारला. नागरिकांच्या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नाल्यात व नागनदीत कोणीही कचरा टाकू नये. नदी-नाले स्वच्छ ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी तेथील नागरिकांना केले. कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे तयार करण्यात आलेले पत्रक नागरिकांच्या घरी जाऊन दिले. स्वच्छतेबद्दलची जनजागृती केली.
या प्रसंगी लकडगंज झोनल अधिकारी प्रमोद आत्राम, निरीक्षक खोब्रागडे, बंडुभाऊ फेदेवार, रितेश राठे, उर्मिला चंदनबोंडे, मनीषा अतकरे, महेंद्र बागडे, चक्रधर अतकरे,हरिश्चंद्र बोंडे आदी उपस्थित होते.