नागपूर – विदर्भासह आसपासच्या प्रदेशातील गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून आपण नागपूरमध्ये एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणले आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहणार नाही, याची पूर्ण काळजी घ्या, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) एम्सच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ना. श्री. नितीन गडकरी यांनी एम्स येथील कामाचा आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी एम्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व डॉक्टरांची उपस्थिती होती. ‘कोणत्या उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी तसेच तपासण्यांसाठी वेटिंग लिस्ट आहे आणि ‘वेटिंग लिस्ट’चे कारण काय आहे, याचा शोध घ्या. अशी परिस्थिती एम्ससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधीच उद्भवणार नाही, याची विशेष काळजी घ्या. गरिबांना उपचारासाठी वाट बघायला लावू नका. गरज पडल्यास नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घेता येईल का, हे तपासून बघा,’ अशी सूचना ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. यासोबतच एम्समधील परिचारिकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
मुबलक औषध साठा आहे की नाही, तपासण्या करणारी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याचीही पूर्ण काळजी घ्या. एम्समधील पूर्ण व्यवस्थेचा लाभ गरिबांना होईल यादृष्टीने काम करावे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट युनिट, सिकल सेल युनिट, न्युक्लियर मेडिसिन आणि आय बँक या विभागांचेही उद्घाटन झाले.
सिकलसेलच्या रुग्णांचा उपचार झालाच पाहिजे
ज्या भागात आपण एम्स उभे केले आहे, तेथील सर्वांत मोठी समस्या सिकलसेल आणि थॅलेसिमियाची आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एम्समध्ये त्यांचा उपचार झालाच पाहिजे, असा आग्रह ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. ज्यांना गरज आहे अशा जास्तीत जास्त रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट एम्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे, असेही ते म्हणाले.