तलावाच्या सौन्दर्यीकरण कामाचे भूमिपूजन आपली कामे जनतेपर्यंत पोचवा
नागपूर: गांधीसागर तलावात अनेक ड्रेनेज लाईन सोडण्यात आल्या आहेत. या लाईन आधी बंद करा. तसेच तलावातील 3-4 मीटर खोल माती काढून शेतकऱ्यांनी न्यावी यामुळे तलावात पाण्याची पातळी वाढेल. शहराचा चेहरा मोहरा बदलेल अशी मोठी व खूप कामे आपण केली आहे, ही सर्व कामे व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गांधीसागर तलावाच्या सौन्दर्यीकरण कामाचे भूमिपूजन करताना ना गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, खा. डॉ महात्मे, आ प्रवीण दटके, आ विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना गडकरी पुढे म्हणाले- या भागातील पावसाचे पाणी तलावात साठवले जावे यासाठी योजना तयार करा. एरिएशन कारंज्यांमुळे तलाव साफ होतात याचाही अभ्यास करा. या तलावात 4 ते 6 सीटर विमान उतरावे असे माझे स्वप्न आहे. तलावात 3-4 मजली तरंगते रेस्टॅरंट तयार करून लहान कार्यक्रम घेता येतील अशी व्यवस्था निर्माण करता येईल. हे सर्व पीपीपीतून करता येईल, असेही ते म्हणाले.
चिटणीस पार्क विकासाचा आराखडा तयार करा. जमिनीखाली पार्किंग, मार्केट व वरच्या बाजूला स्टेडीयम बांधता येईल. फुटाळाचा विकास आपण आपण करीत आहोत. उच्च शैक्षणिक, आधुनिक वैद्यकीय सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. रस्ते, उड्डाणपूल, डबल डेकर पूल, अशी खूप कामे आपण केली आहेत. आता ध्वनी, वायू, जल प्रदूषण मुक्त शहर बनवायचे आहे. नागनदीचा विकास होणार आहे. 2400 कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. अंबाझरी ते गोसीखुर्द वॉटर टॅक्सी चालविण्याचा प्रयत्न आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाने आपल्या सर्व गाड्या सीएनजीवर चालवाव्या, अशी सूचनाही ना. गडकरी यांनी केली.
ब्रॉड गेज मेट्रो लवकरच सुरू होत आहे. 100 मेट्रो खाजगी व्यावसायिकांना देणार आहे. 30 कोटींची एक मेट्रो आहे. अजनी येथे मोठे स्टेशन बांधून ते शहरातील सर्व बाजूच्या रस्त्यांना जोडणार आहे. नागपूर स्टेशनही मोठे करणार आहे. 120 खेळाची मैदाने विकसित होत आहेत. ही सर्व कामे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवा. जनतेने आपल्याला संधी दिली म्हणून आपण ही कामे करू शकलो. या सर्व चौफेर कामाचे श्रेय जनतेचे आहे, असे सांगून कॉटन मार्केटचा विकासही करायचा असल्याचे ना. गडकरी म्हणाले.