नागपूर: राज्याच्या उपराजधानीत ‘हिट अँड रन’च्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. सदर उड्डाणपुलावर अशाच प्रकारची घटना समोर आली असून नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या – डॉक्टर दाम्पत्याला एका अनियंत्रित एसयूव्हीचालकाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात डॉक्टर दाम्पत्याच्या कारचे मोठे नुकसान झाले. दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. वीरेंद्र काळे (४७) आणि त्यांची पत्नी लता काळे (४७, रा. उमरेड मार्ग) अशी जखमींची नावे आहेत. काळे दाम्पत्यांचे उमरेड मार्गावर रुग्णालय आहे. काटोल येथे त्यांचे नातेवाईक राहतात. २५ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता हे काळे दाम्पत्य त्यांच्या नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी कारने काटोलला जात होते. डॉ. वीरेंद्र काळे गाडी चालवत होते. ते संविधान चौकातून सदर उड्डाणपुलामार्गे निघाले होते. त्याचदरम्यान जुना काटोल नाका चौकाजवळ विरुद्ध दिशेने एमएच ३१ एफई ७८६४ या क्रमांकाची एसयूव्ही या भरधाव कारने डॉ. काळे यांच्या कारला धडक दिली. एसयूव्हीमध्ये तीन-चार तरुण होते त्यांचा वेग १२० हून अधिक असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी सदर पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.