नागपूर : डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ चालली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मेडिकलमध्ये अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मेडिकलमध्ये ३७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह विद्यार्थ्याला मारहाण केली.
मारहाण झालेल्या निवासी डॉक्टरांमध्ये डॉ. शुभम महल्ले, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. राहुल अग्रवाल यांच्यासह एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
माहितीनुसार, सोमवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान कल्पेश यादव (वय ३७-शताब्दीनगर) याला नातेवाइकांनी कॅज्युल्टीमध्ये आणले. त्याला आतड्याचा गंभीर आजार होता. अचानक पोटदुखी वाढली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. सोनोग्राफीसाठी रेडिओलॉजी विभागात पाठवले.
सोनोग्राफीनंतर सीटी स्कॅन करण्यासाठी पाठवले. सीटी स्कॅन विभागात कमलेशची प्रकृती गंभीर झाली. तेव्हा सकाळी ११ वाजून १५ मिनिटे झाली होती. निवासी डॉक्टरांनी तत्काळ सीपीआर दिला, त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याच्या आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रेडिओलॉजी विभागात डॉक्टरांना मारहाण सुरू केली. डॉ. शुभम महल्ले, डॉ. राहुल अग्रवाल व सर्जरी विभागाची महिला निवासी डॉक्टर प्राची अग्रवाल तसेच बीपीएमटीच्या पदवीधारकालाही नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांना मारहाण होत असताना त्यांच्या मदतीसाठी कोणीच धावले नाही. मात्र उपस्थित अनेक नातेवाइकांनीही मारहाण केल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान या घटनेसंदर्भात अजनी पोलिस ठाण्यात निवासी डॉक्टर तक्रार नोंदवण्यासाठी गेले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी नातेवाइकांवर गुन्हा नोंदवण्यासाठी परवानगी दिली होती, परंतु उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याची माहिती आहे.