मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासस्थानी गणपती दर्शनासाठी गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरन्यायाधीश आणि मोदींवर हल्लाबोल केला.धनंजय चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहे. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत.
पंतप्रधान किती जणांच्या गणेशोत्सवासाठी गेले याची माहिती नाही. पण काल ससरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आले, आरती केली आणि त्यांच्या दोघांतील संवाद पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पहायला मिळाले.खरे म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.
आमच्याही मनात प्रश्न आला की पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्हाला योग्य न्याय देतील का? आम्ही जी लढाई करतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडताहेत अशा आमच्या मनात शंका आहे, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष महाराष्ट्रात एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते. हे सरकार घटनाबाह्य आहे असे सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरी निर्णय आणि निकाल होत नाही,असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.