मुंबई:राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शरद पवारांवर टीका करण्यास सुरुवात केली. यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले.
आम्ही लोकसभेच्या पराभवातून शिकलो आणि विधानसभा जिंकलो. महाविकास आघाडीने 90-90-90 घेऊन युती केली होती. 90 घेऊन कधी युती टिकते का? नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी 90 घेतली, त्यामुळे त्यांची युती टिकली नाही, आमची टिकली.आम्ही जनतेत गेलो, दौरे केले, प्रत्येक विधानसभेत आमचे कार्यकर्ते होते, असेही बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीच नाही. एखाद्या पुरस्काराची निवड करणे आणि सत्कार करणे ही संस्कृती आहे. संजय राऊत शरद पवार यांना सल्ले द्यायला लागला आहे, ते सल्ला घेतील का? राऊत का चिडचिड करत आहे माहिती नाही. राऊतांची उंचीच नाही, त्यांनी एक तरी निवडणूक लढवली आहे का? त्यांनी एका तरी विधानसभेत निवडणूक लढवून दाखवावी. अमित शाहांनी 11 निवडणुका लढल्या आहेत, प्रत्येक निवडणुका ते जिंकलेत. अमित शाह कुठे आणि संजय राऊत कुठे? असा खोचक टोलाही बावनकुळे यांनी लगावला.