नागपूर: चीनमधून भारतात आलेल्या नवीन विषाणू ‘ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) संदर्भात नागपूरकरांनी सर्तक रहावे. शहरात दोन संशयीत रुग्णांची नोंद झालेली आहे. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. हा जरी हंगामी रोग असला तरी याला घाबरु नका, दक्षता घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
चीनमध्ये ‘ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) उद्रेक झाला आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हायरस (एचएमपीव्ही) एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. ‘ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक
दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि या पार्श्वभूमीवर मनपा कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करण्यात येत असून परिस्थितीवर बारीक लक्ष देण्यात येत आहे. नागपूर शहरातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांनी सर्दी-खोकला अर्थात आय.एल.आय. (COVID-19, INFLUENZA-A, H1N1, H3N2, H5N1, HMPV) रुग्णाबाबतची माहिती या कार्यालयास नियमीत देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. याकरीता हेल्पलाईन संपर्क क्रमांक 9175414355 व ई-मेल nmcepidemic@gmail.com कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली आहे.
नागपूर शहरात एचएमपीव्हीच्या दोन संशयीत रुग्णांची नोंद
नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एचएमपीव्ही रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून सध्या दोन संशयीत रूग्ण असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. यापैकी एक रूग्ण 7 वर्षीय मुलगा असून दुसरा रुग्ण 14 वर्षाची मुलगी आहे. या दोन्ही रूग्णांना ताप, सर्दी, खोकला अशी सर्वसामान्य लक्षणे होती. या दोन्ही रुग्णांचे उपचार बाह्यरुग्ण स्वरूपात सामान्यपणे करण्यात आले असून यापैकी कोणालाही रुग्णालयात भरती करण्याचे गरज निर्माण झाली नाही. सध्या दोन्ही रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे असून पूर्णपणे बरे झाले आहेत. दोन्ही रुग्णांच्या निवासी परिसरात घरोघरी सर्वेक्षण द्वारे आय.एल.आय. रूग्णांची रुग्ण शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. मात्र कुठेही आय.एल.आय.रुग्णाचे क्लस्टर आढळून आले नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय (IGGMC) आणि मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय (IGR) येथे प्रत्येकी 10 बेड एकूण 30 बेड HMPV रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. रूग्णाचे नमूने निश्चित निदान व जिनोम सिक्वेक्सींग करीता AIIMS नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. मनपा आरोग्य केंद्रात HMPV तपासणी व उपचाराची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार रुग्णांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. नागरिकांना न घाबरता जवळच्या मनपा दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन डॉ. दीपक सेलोकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.
हे करा :
Ø जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
Ø साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
Ø ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा.
Ø भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
Ø संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नका :
Ø हस्तांदोलन
Ø टिश्यू पेपर आणि रूमालाचा पुनर्वापर
Ø आजारी लोकांशी जवळचा संपर्क
Ø डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
Ø सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
Ø डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.