मुंबई : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या मागणीला विरोध केला आहे.
यावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
आरक्षणावरून राज्यात जो मराठा-ओबीसी संघर्ष सुरू आहे, तो दुर्देवी आहे. कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला देऊ नये, ही शिवसेनेची (ठाकरे गटाची) भूमिका आहे. आज सर्वच समाजात मागासलेपण आहे. त्याला कारण नरेंद्र मोदी सरकारची धोरणे आहेत, हे सरकार १० वर्षात अपयशी ठरल्याने हे समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले असल्याचे राऊत म्हणाले.
आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, तो थांबावायचा असेल तर सरकारला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे, असेही राऊत म्हणाले.