नागपूर : रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कंत्राटदाराकडून दुप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य रेल्वेस्थानकावर असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी कंत्राटदाराकडून वाहनधारकाची सरार्स लूट सुरु आहे. एक दुचाकी पार्किंग करण्यासाठी अर्ध्या तासाला १० रुपये शुल्क घेण्याची कंत्राटदाराला मुभा आहे. मात्र, कंत्राटदाराची माणसं दुचाकीचालकांकडून सर्रास २० रुपये वसूल करतात.
भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला हे देखील कंत्राटदाराच्या प्रकाराला बळी पडले.
शुक्ला यांच्याकडून अशाच प्रकारे १० ऐवजी २० रुपये वसूल करून पार्किंगमधील व्यक्तीने त्यांना आज २० रुपयांची पावती दिली. यासंदर्भांत शुक्ला यांनी जाब विचारला असता कंत्राटदारांनी त्यांच्याशी वाद घातला. शुक्ला यांनी या गैरप्रकाराची तक्रार रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे, तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांकडे केली. या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाकडन कोणते पाऊले उचलण्यात येतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.