नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सचिवपदी डॉ. राजेंद्र गवई यांची निवड करण्यात आली. भदंत आर्य सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वी डॉ. सुधीर फुलझेले यांनी प्रकृतीच्या कारणामुळे समितीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. सचिव पदाकरिता डॉ. राजेंद्र गवई यांचे नाव डॉ. प्रदीप आगलावे यांनी सुचविले. तर विलास गजघाटे यांनी अनुमोदन दिले.
बैठकीत डॉ. कमलताई गवई, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्राचार्य. डी. जी. दाभाडे,एन. आर सुटे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, ऍड. आनंद फुलझेले, भदंत नागदिपांकर इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा असून तो स्तूप देशातील सर्व बौद्धांचे उर्जास्थान बनले आहे.