डॉ. आशिष देशमुख हे वुडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि २०११ पासून आशियाई वुडबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. ते तैपेई सिटी, तैवान येथे आंतरराष्ट्रीय वुडबॉल फेडरेशन (IWbF) च्या सर्वसाधारण सभेत सम्मिलित झाले आहेत. ते ११ डिसेंबर २०२२ ते १४ डिसेंबर २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय वुडबॉल फेडरेशनचे अधिकृत आमंत्रण स्वीकारून सभेत भाग घेत आहेत.
भारतातील शहरी आणि ग्रामीण भागांसह सर्व क्रीडा संस्था आणि महाविद्यालयांमध्ये वुडबॉल खेळ विकसित करण्यात डॉ. आशिष देशमुख यांची मुख्य भूमिका आहे. भारतातील सर्व स्तरांवर वुडबॉल खेळाच्या प्रचार आणि विकासासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय वुडबॉल फेडरेशनच्या माध्यमातून पुढाकार घेतला. कोरिया, तैवान आणि मलेशिया येथे झालेल्या जागतिक वुडबॉल चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक दशकांपासून त्यांच्या अथक आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे वुडबॉल खेळाला भारतात वैभव प्राप्त झाले आहे.
तसेच अरुणाचल प्रदेशातील झिरो जिल्ह्यातील इंदिरा गांधी टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी येथे सहा आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून वुडबॉल खेळ अधिकृतपणे नोंदणीकृत झाला आहे. तसेच राष्ट्रीय शालेय खेळ आणि अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ खेळामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अनेक युवक उत्तम खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर राज्यांचे प्रनिनिधीत्व करत आहेत. २०१४ पासून डॉ. देशमुख भारतीय मिनी गोल्फ फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्षपदही सांभाळत आहेत.
जेसिका हाँग, सचिव, आंतरराष्ट्रीय वुडबॉल फेडरेशन यांनी १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या IWbF च्या जनरल असेंब्ली २०२२ मध्ये सामील होण्यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. आशिष देशमुख यांना आमंत्रित केले आहे. यात चर्चेसाठी अनेक विषयांचा समवेश आहे. मंजुरी शुल्क आणि सदस्यत्व वर्गणीसह आर्थिक अहवालांचे पुनरावलोकन, २०२३ मधील आंतरराष्ट्रीय वुडबॉल स्पर्धा, तिसऱ्या IWbF बीच वुडबॉल विश्वचषक २०२३ चे आयोजन, विश्वचषक वुडबॉल चॅम्पियनशिप २०२४ च्या आयोजनाची तारीख, IWbF युनिव्हर्सिटी वुडबॉल चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन इत्यादि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी डॉ. आशिष देशमुख यांना आमंत्रित केल्या गेले आहे.
डॉ. आशिष देशमुख आंतरराष्ट्रीय वुडबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप अजेंडाच्या हितासाठी तेथील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीसाठी आणि पुढाकारासाठी IWbF द्वारे कौतुक केल्या जात आहे. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय वुडबॉल महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण मानवटकर हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.