वर्धा – हरियाणा राज्यातील मुल्लाना येथील महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू तथा महासंचालक डॉ. एस. जी. दामले यांनी सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालयाला भेट देत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यापन उपक्रमांतर्गत बालदंतरोग चिकित्सा विभागाद्वारे डॉ. दामले यांच्या तीन संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या सदिच्छा भेट उपक्रमात डॉ. दामले यांनी पहिल्या सत्रात ‘एचआयव्ही एड्सबाधित लोकांचे भविष्य’ यावर संवाद साधला. दुसऱ्या सत्रात त्यांनी ‘डेंटल केरिज गो बियॉन्ड रिस्टोरशन’ या विषयाची मांडणी केली. या सत्रांचे संचालन डॉ. नीलिमा ठोसर, डॉ. राशी दुबे, डॉ. रामकृष्ण येलुरी, डॉ. मोनिका खुबचंदानी यांनी केले. तर दुपारनंतरच्या तिसऱ्या सत्रात दोन केस स्टडीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. दामले यांनी बालरुग्णांच्या दातांचे एक्सट्रूसिव्ह लक्झेशनसाठी व्यवस्थापन आणि बालदंतरोग रुग्णामध्ये मॅक्झिलरी व मॅन्डिब्युलर फ्रॅक्चरचे आधुनिक कॅप स्प्लिंटद्वारे व्यवस्थापन याबाबत प्रत्यक्ष सादरीकरण केले. सोबतच, लहान मुलांच्या आकस्मिक व अपघाती जखमांवरील उपचारांच्या प्रोटोकॉलबाबत त्यांनी संवादात्मक मार्गदर्शन केले. या सत्राची सूत्रे डॉ. नेहा पानके व डॉ. मीनल पांडे यांनी सांभाळली.
या सदिच्छा भेटीनिमित्त दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, महासंचालक डॉ. राजीव बोरले, दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे यांच्या हस्ते डॉ. दामले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ. अलका हांडे, बालदंतरोग चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. नीलिमा ठोसर, डॉ. रामकृष्ण, येलुरी यांचे मार्गदर्शन लाभले.