नागपूर: शहरात १३ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त कामठी येथे भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. श्री हनुमान जयंती शोभायात्रा उत्सव समिती, कामठी यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या शोभायात्रेमध्ये झाकी, बॅण्ड पथक, भजन मंडळींचा समावेश असणार आहे. यामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
त्यासोबतच, दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे देखील भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. विविध चौकांमध्ये कार्यक्रम, रॅली व मिरवणुकांचे आयोजन होणार असल्याने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही मार्गांवर जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
प्रतिबंधित मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे-
१. नागपूर कडून कन्हानकडे जाणारी जड वाहतूक:
आषा हॉस्पीटल चौक, गरूड चौक, कळमना टी पॉईंट, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, कन्हान पुलीया मार्गे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग: आशा हॉस्पिटल चौकातून डावे वळून खापरखेडा मार्गे कन्हानकडे वळवण्यात येणार.
२. कन्हानकडून नागपूरकडे येणारी जड वाहतूक-
कामठी मार्गे नागपूरकडे येणाऱ्या सर्व जड वाहनांवर बंदी.
पर्यायी मार्ग: लिहीगांव पुलीया, कापसी ते पारडी मार्गे नागपूरकडे वळवण्यात येईल.
ही अधिसूचना १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजल्यापासून ते १४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.०० वाजेपर्यंत लागू राहील.
नागपूर शहरातील सर्व वाहनचालकांनी ही अधिसूचना लक्षात घेऊन पोलिसांना सहकार्य करावे व पर्यायी मार्गांचा वापर करून संभाव्य गैरसोयीपासून बचाव करावा, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर संजय पाटील यांनी केले आहे.