जालना: डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे मुक्ती संग्रामातील तसेच नेत्रसेवा आणि महिकोच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची माहिती नवीन पिढीला होण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
स्वर्गीय डॉ. बारवाले यांनी स्थापन केलेल्या जालना येथील महिको रिसर्च फाउंडेशन ट्रस्टच्या श्री गणपती नेत्रालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल,चेअरमन डॉ. राजेंद्र बारवाले, वैद्यकीय संचालक डॉ.ऋषिकेश नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मराठीत शुभेच्छा देऊन राज्यपालांनी भाषणास सुरुवात केली. श्री. गणपती नेत्रालयाच्या गौरवपूर्ण कार्याचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ग्रामीण भागातील गोरगरीबांना गेल्या 10 वर्षापासून उत्तम आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करुन देऊन नेत्रालयात राज्यातील सर्वांत मोठी नेत्रपेढी निर्माण केली आहे. सामाजिक भान जपणाऱ्या श्री गणपती नेत्रालयाच्या उभारणीत डॉ. बद्रीनारायण बारवाले यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला वाहिलेल्या नेत्रालयाची प्रगती अत्यंत उल्लेखनीय असून अंधत्वमुक्त गाव निर्माण करण्याची सुरु केलेली योजना अत्यंत गौरवास्पद आहे. असेही ते म्हणाले.
डॉ. बारवाले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चरित्रग्रंथाचे प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते यावेळी झाले. त्या अनुषंगाने बोलताना राज्यपालांनी डॉ. बारवाले यांच्या स्मृतींना उजळा दिला व त्यांचे कार्य नव्या पिढीला सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त केली. डॉ. बारवाले यांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नेत्रालय, महिको या संस्था पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जालना येथे कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिली असल्याचे सांगून या संस्थेची उभारणी लवकरात लवकर करुन विद्यापीठाने युवा पिढीला कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करावे व प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात असे आवाहन राज्यपालांनी केले.
जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलाचा परिणाम मराठवाड्यासारख्या भागावर जास्त होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन राज्यपालांनी या संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादित केली
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना नेत्रालयाच्या कार्याचा गौरव केला व गोरगरीब रुग्णांसाठी करीत असलेल्या दर्जेदार आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ.बारवाले यांच्या आठवणींना उजळा देत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी श्री गणपती नेत्रालयाच्या दर्जेदार रुग्णसेवेमुळे जालना शहराचे नाव राज्यच नव्हे तर देशभर पोहोचल्याचे सांगत नेत्रालयाच्या उत्कृष्ट कार्याचा आपल्या भाषणात आढावा घेतला. महिकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देऊन कृषिक्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगून त्यांनी बारवाले कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. खासदार रावसाहेब दानवे यांनीही यावेळी नेत्रालयाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत डॉ. बारवाले यांच्या दूरदृष्टी आणि सामजिक बांधिलकीबाबत आठवणी सांगितल्या.
प्रांरभी श्री. गणपती नेत्रालयचे चेअरमन राजेंद्र बारवाले यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सुसज्ज नेत्रालयातून 1 लाख 98 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाले असून निवारणीय अंधत्वमुक्त गावांची संकल्पना राबविण्यातही नेत्रालय यशस्वी होत आहे. यापुढेही माफक दरामध्ये अति उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. श्री गणपती नेत्रालयाने नेत्रसेनेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत जिल्ह्यातील चार गावे निवारणीय अंधत्व मुक्त गावे म्हणून घोषित केली. त्यापैकी पिंपळगाव थोटे ता. भोकरदन आणि रामखेडा ता. बदनापूर या गावांच्या सरपंचांचा राज्यपाल यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राजेश टोपे, नेत्रालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता काबरा यांनी केले.