डॉ. पां. स. खानखोजे स्मृती पुरस्कार वितरण
नागपूर: डॉ. पां. स. खानखोजे यांचे जीवन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाशी जुळणारे होते. 22 व्या वर्षी त्यांनी लो. टिळकांपासून प्रेरणा घेतली व ते विदेशात गेले. मेक्सिको येथे कृषी क्षेत्रात 1500 पिकांच्या जाती त्यांनी शोधल्या व त्यावर संशोधन केले. कृषी क्षेत्रात त्यांचे क्रांतिकारी योगदान आहे. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले संशोधन आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
या प्रसंगी न्या. विकास सिरपूरकर, प्रा. अनिल सोले, डॉ. साहनी, सुनील खानखोजे, सौ. वंदना बडवाईक, रमेश बक्षी, कुलगुरु डॉ. भाले, वसंतराव देवपुजारी व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी ना. गडकरी यांच्या हस्ते ‘असे होते डॉ. खानखोजे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले- डॉ. खानखोजे यांनी लो. टिळकांपासून प्रेरणा घेऊन आझाद हिंद सेना व पुढे गदर पक्षाच्या माध्यमातून हिंदुस्थानच्या स्वाधीनतेसाठीच्या लढ्यात स्वत:ला झोकून दिले. पण हा इतिहास आपण लिहून ठेवला नाही. ब्रिटनमध्ये प्रत्येक जण जसा डायरी लिहितो. नंतर त्याची नोंद इतिहासात घेतली जाते. तशी आपल्याकडे पध्दत नाही. समाजाने डॉ. खानखोजे यांच्या या कार्याची नोंद घेणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले.
ज्या व्यक्तीने आपल्या देशासाठी, आपले सर्वस्व बलिदान करून संघर्ष केला, त्या व्यक्तीचा सन्मान करून त्याची आठवण जेवढी आपण ठेवायला पाहिजे तेवढी ती ठेवली गेली नाही, ही आपल्या समाजाची खंत आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आपल्या देशातही मोठी माणसे होऊन गेली. पण त्यांच्या कार्याचा इतिहास योग्यप्रकारे लोकांपर्यंत गेला पाहिजे. डॉ. खानखोजे यांच्या जीवनकार्यावर एक 10 मिनिटांची फिल्म तयार करावी व त्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचावी. नूतन भारत ही शाळा त्यांनी स्थापन केली. ही शाळा त्यांचे स्मारक आहे. शाळेचे स्वरूप आता बदलले पाहिजे. सीबीएसई असणे आवश्यक आहे. शाळा चालवणे हेही एक कौशल्य आहे. ही शाळा मोठी झाली पाहिजे. जुनी इमारत पाडून नवीन इमारत करा व शाळा मोठी करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असेही ना. गडकरी म्हणाले.
त्याग, तपस्या आणि बलिदान हा डॉ. खानखोजे यांचा गौरवशाली इतिहास असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- जनुकीय विज्ञान (जेनेटिक सायन्स)मध्ये त्यांनी संशोधन केले आहे. संशोधनाचे मोठे काम त्यांनी केले आहे. या क्षेत्रात काम करणार्या शास्त्रज्ञांना डॉ. खानखोजे यांच्या नावाने पुरस्कार द्यावा, म्हणजे त्यांचे कार्याचा अधिक प्रचार प्रसार होईल, असेही ते म्हणाले.