नागपूर :देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपा जागा दाखवली,अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी भाजपावर केली.महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला, याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली. या कारणामुळेच केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्याआधीच राजीनामा देण्याचे नाटक ते करत आहेत, अशा शब्दात लोंढे यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात झालेल्या पराभवाची मी जबाबदारी घेतो. मला पदातून मुक्त करा,असे फडणवीस म्हणाले. यावर बोलतांना लोंढे म्हणाले की, राज्यात असंवैधानिक सरकार चालवत आहे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आहे.
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत दोन पक्ष फोडून आलो हेही फडणवीस यांनीच जाहीरपणे सांगितले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिरावून मित्रांना दिले व त्या पक्षाचे चिन्हही काढून घेतले.भाजपने सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे पक्षफोडीचे जे राजकराण केले ते महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही.
भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप होता. त्यामुळेच जनतेने या निवडणुकीत त्याना धूळ चारल्याचे लोंढे म्हणाले.