नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी एचक्यूएमसी संघाचा पराभव करीत डीएसए संघ अजिंक्य ठरला.
डब्ल्यूसीएल मैदानावर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत डीएसए संघाने एचक्यूएमसी संघाला ५२ धावांनी मात दिली. डीएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत निर्धारित १० षटकांमध्ये ४ बाद १२४ धावा काढल्या. संघाच्या सचिन कटारियाने अवघ् २१ चेंडूंमध्ये ५५ धावांची अर्धशतकी खेळी करीत संघाचा धावफलक वाढविण्यात मोठे योगदान दिले. संजोग बिनकर (२१) आणि अमोल चिंते (१६) यांनी दमदारनाबाद खेळी केली. एचक्यूएमसी संघाकडून निर्मलने २ तर अमित यादव आणि रवींद्र पूनीया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. इतर गोलंदाजांना मात्र यश आले नाही.
प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला एचक्यूएमसी संघ डीएसए संघाच्या गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे फारशी कामगिरी करू शकला नाही. अवघ्या ७.४ षटकांतच संपूर्ण संघ ७२ धावांत गारद झाला. डीएसएच्या अनूज वझलवारने अवघ्या १.४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार अमित पौनीकर आणि विकी यादवने प्रत्येकी २ तर शैलेश हर्बडे आणि अमोल चिंतेने प्रत्येकी १ गडी बाद केला. एचक्यूएमसी संघाचा कर्णधार रेश कुमारने (२५) आणि सूर्यवीर (१२) वगळता अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही.
विजेत्या डीएसए संघाला ३१ हजार रुपये रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. डीएसएच्या सचिन कटारियाला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.