Published On : Thu, Nov 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

Video : व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागपुरातील प्रमुख भागांचे सौंदर्यीकरण तर काही परिसरात कचऱ्याचे साम्राज्य ! 

Advertisement

नागपूर : शहरात डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा आणि विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपुरातील प्रमुख ठिकाणांचेच सौंदर्यीकरण सुरु केले आहे. मात्र शहरातील इतर परिसरात कचऱ्यांचे साम्राज्य दिसत आहे. तर रस्त्यांची अवस्थाही  दयनीय आहे. त्यामुळे नागपूरकरांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरमध्ये शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यानंतर ७ ते २० डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहेत. यानिमित्ताने नागपुरातील काही भागांची  कायापालट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. शहारात युद्ध पातळीवर ही  कामे करण्यात येत असल्याने गुणवत्ता कोणत्या स्वरूपाची असणार हे तर काही काळानंतर समजेलच. मात्र नागपुरात केवळ व्हीव्हीआयपी येणार यानिमित्तानेच स्वच्छता आणि  सौंदर्यीकरणाचे काम करणे कितपत योग्य ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रपती दौरा आणि अधिवेशनानिमित्त रस्ते, विधिमंडळाची इमारत, आमदार निवास, रविभवन व अन्य ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जात आहेत. तर उत्तर नागपुरात नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ठिकठिकणी कचऱ्यांचे ढिगारा पडले आहे तर काही  भागात रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळत आहे.

शहरातील अनेक भागात नागरी सुविधांचा अभाव :
कोणत्याही शहराचा विकास हा प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जातो. परंतु नागपूर देशातील एकमेव असे शहर आहे की या शहरात महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास अशा दोन संस्थांवर शहर विकासाची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, गडरलाईन, पथदिवे अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी या दोन संस्थांवर आहे. मात्र अद्यापही शहरात सर्वांगीण विकास झालेला नाही. नागरिकांकडून विकास शुल्काच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले. परंतु अनेक भागांचा  अद्यापही  विकास झालेला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

ठराविक वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेकडे दुर्लक्ष :

राष्ट्रपती दौरा आणि हिवाळी अधिवेशनामुळे वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कालांतराने याचा फटका नागपूरकरांना बसणार आहे. करदात्यांच्या पैशातून हा खर्च केले जात असल्याने याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दरवर्षी होणारे अधिवेशन व  व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहररस्ते दुरुस्ती व अनेक कामे केली जातात. या कामांची गुणवत्ता तपासणी कधीही होत नाही.

Advertisement
G20 परिषदेदरम्यान करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाचा फज्जा –
नागपूरमध्ये झालेल्या सी-२० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने एक महिन्यात शहर सौंदर्यीकरणाचे शेकडो कामे पूर्ण केली होती. मात्र, ही परिषद संपल्यावर या कामांचा फज्जा उडाला होता. छोट्या -छोट्या कामांसाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. मात्र अद्यापही या खर्चाची चौकशी झाली नाही.  नागपूर अधिवेशनाच्या कामावर दरवर्षी कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते, हे विशेष.