नागपूर : ई-मार्केटिंगचा व्याप पाहता तरुणांमध्ये ब्रँडेड कपडय़ांची क्रेझ वाढली आहे. याच क्रेझचा फायदा घेत नागपुरातील अनेक दुकाने डुप्लिकेट ब्रँडेड कपडे विकून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. शहरात एक मोठे रॅकेट सक्रिय असून, मोठ्या दुकानांमध्ये हे डुप्लिकेट कपडे विकले जात असल्याची माहिती कळताच पोलिसांनी 4 दुकानांवर छापेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इतवारीतील ब्रँडेड कंपन्यांच्या डुप्लिकेट जीन्स आणि टी-शर्टची विक्री करणाऱ्या चार दुकानांवर छापा टाकला. या छाप्यांमध्ये पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचे बोगस कपडे जप्त केले आहेत.
रेडिमेड कापड कंपनीच्या अधिकाऱ्याला ब्रँडेड कंपन्यांचे डुप्लिकेट टी-शर्ट आणि जीन्स विकणाऱ्या दुकानांची माहिती मिळाली. ते डुप्लिकेट कपड्यांवर विविध ब्रँडचे लेबल वापरत होते. त्यांनी ही माहिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत या काळ्या बाजाराचा भंडाफोड केला. पोलिसांनी शनिवारी दुकानांवर छापे टाकून तयार कपडे जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दीपा रेडीमेड, शाहिद चौक, भंडारा रोड आणि माँ महालक्ष्मी गारमेंट्स, मनीष गारमेंट्स आणि शारदा गारमेंट्स येथून डुप्लिकेट कपडे जप्त केले. या दुकानांमध्ये लेव्ही कंपनीच्या कपड्याच्या नावाखाली डुप्लिकेट कपडे विकले जात होते.
दीपा रेडीमेड स्टोअर्सचे व्यवस्थापक रोहित जैन, माँ महालक्ष्मी गारमेंट्स आणि माँ शारदा गारमेंट्सचे मालक विशाल खोडे आणि मनीष गारमेंट्सचे मालक अखिलेश मोदी यांच्याविरुद्ध तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.