नागपूर: केंद्रीय महामार्ग, परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना संक्रमण होत असतानाा केंद्र शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन दरम्यान दीड कोटी जनतेशी विविध माध्यमातून संवाद साधत त्यांची विचारपूस केली व त्यांना हिंमत दिली. कोरोनाशी संपूर्ण देश लढत असताना कोणाचीही हिंमत खचणार नाही यासाठी व त्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी संपर्क केला.
व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून विविध उद्योजकांशी, विविध व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजनाही सुचविल्या. प्रश्नांचे निराकरण करून केंद्र शासनाच्या वित्त विभाग, व्यापार विभाग, रेल्वे विभाग आदींसंबंध असलेल्या प्रश्नांबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार आणि चर्चेतून निराकरण करण्याचा प्रयत्न केला. कोरोना या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न गडकरी यांनी या काळात केला. कोरोना आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारतीय आयात कमी करून निर्यात कशी वाढवता येईल, तसेच ज्या वस्तूंसाठी आम्ही अन्य देशांवर अवलंबून आहोत, त्या वस्तू देशात कशा निर्माण करता येतील, यासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाकडून देण्यात येईल असे आश्वासनही या संपर्कादरम्यान त्यांनी दिले. मुंबई, पुणे, गुडगाव अशा विकसित असलेली शहरे वगळून अन्य शहरांकडे उद्योग वळावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कृषीवर आधारित उद्योगांच्या माध्यमातून त्या संबंधित क्षेत्राचा विकास करणे शक्य होईल आणि युवकांना रोजगार उपलब्ध होईल, याकडेही त्यांनी या चर्चेत लक्ष वेधले.
गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत गडकरी यांनी अनेक व्यावसायिक, संघटना, पत्रकार, उद्योजक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आपले विचार त्यांच्यासमोर मांडले. या सर्वांकडून प्राप्त झालेल्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या. त्यात एफआायसीसीआय, एसएमई, पीएचडी, चेंबर ऑफ कॉमर्स, एआयपीएमए, भारतीय शिक्षण मंडळ, यंग प्रेसिडेंग ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कौन्सिल, असोचम, सीईओ क्लब ऑफ इंडिया, भारत चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई मुंबई आदी संघटनांच्या प्रतिनिधिशी टिव्टर, फेसबुक, यूट्यूब, न्यूज चॅनेल आदींच्या माध्यमातून संवाद साधला.
या संवादाबद्दल यूके, युएसए व यूएई आणि अरब देशाच्या नागरिकांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. आज दिनांक 26 रोजी सायंकाळी इंडियन ओव्हरसीज स्कोलर्स अॅण्ड स्टुडंट्सतर्फे आयोजित जगातील 43 नामांकित महाविद्यालयांतील भारतीय विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.