Representational Pic
आैरंगाबाद/लातूर: लातूरमध्ये औसा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. औसा, किल्लारी, आशिव, बेलकुंड भागात भूकंपाचे सौम्य झटके दुपारी 12.23 वाजता जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 1993 साली झालेल्या भूकंपात येथे 9 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी, सास्तूर परिसरालाही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जवळपास पाच ते सहा सेकंद हा धक्का जाणवला.
जमिनीत आवाज सुरू होऊन घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरली. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. काही सेकंदातच नागरिक घराबाहेर रस्त्यावर आले. लोहारा येथेही काही सेकंद भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. किल्लारी व लामजना (ता. औसा) परिसरातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची 3.01 रिश्टर स्केल इतकी नोंद करण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.