नागपूर : केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात नागपूरच्या कलमेश्वर तालुक्यातील सेलू-कालंब मार्गावर प्लास्टिक व कचऱ्याचा पुनर्वापर करून बिटुमिन पद्धतीने पर्यावरणपूरक रस्त्याचे निर्माण करण्यात आले आहे. ही अभिनव व पर्यावरणस्नेही संकल्पना सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ अंतर्गत राबविण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंते, हॉटमिक्स प्लांटचे मालक व ठेकेदार यांच्यासाठी बिटुमिन रस्त्यांच्या बांधकामावर प्रशिक्षणाचे आयोजन केले. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान हॉटमिक्स प्लांटवर थेट प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विविध आकारांच्या खडीचे मोजमाप, बिटुमिनचे मिश्रण, इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिकल सिंक्रोनायझेशन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे अभियंते आणि ठेकेदारांना प्रत्यक्ष प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण तांत्रिक ज्ञान प्राप्त झाले.
या उपक्रमासाठी उपविभागीय अभियंता रूपेश बोडाडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर ठेकेदार आनंद अशोक बुधराजा यांनी रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी पार पाडली. या प्रशिक्षणात विभागातील ३८ अभियंते सहभागी झाले होते. प्रशिक्षित अभियंत्यांनी सांगितले की, प्लास्टिक कचऱ्याचा योग्य पुनर्वापर करून दीर्घकाळ टिकणारे आणि पर्यावरणपूरक रस्ते बांधण्याचा मार्ग या प्रशिक्षणामुळे स्पष्ट झाला आहे.