उत्तर आणि पूर्व नागपूरमध्ये झंझावाती प्रचार दौरा
नागपूर: संदीप जोशी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. ते विधानपरिषदेत पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून आल्यास त्यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात आणखी उत्तम कार्य करता येईल. पदवीधर आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडण्याविण्यास गती देण्यासाठी संदीप जोशी यांना साथ द्या, असे आवाहन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी पदवीधर मतदारांना केले.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या उत्तर आणि पूर्व नागपूरमधील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. शनिवारी (ता.२८) महापौर संदीप जोशी यांनी उत्तर आणि नागपुरातील विविध भागात झंझावाती संपर्क दौरा केला. विविध ठिकाणी झालेल्या प्रचार दौऱ्यामध्ये शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यासह पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपाचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक मनोज चापले, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष हरीश बाखरू, चेअरमन डॉ. विंकी रूघवानी, महासचिव आय.पी. केशवानी, नवनीतसिंग तुली, भाजपा उत्तर नागपूरचे अध्यक्ष संजय चौधरी, प्रभाकरराव येवले, सिंधू महाविद्यालयाचे प्राचार्य कसबेकर, खोरिप चे नेते माजी आमदार उपेंद्रजी शेंडे, भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेशजी हाथीबेड, सुभाषजी पारधी, अशोकजी मेंढे, रमेशजी फुले, नगरसेवक गोपीचंदजी कुमरे, नगरसेविका निरंजनाताई पाटील, दुर्गाताई हत्तीठेले, ज्येष्ठ नेते घनश्यामदास कुकरेजा, श्री. रूपचंदानी, क्रिपा लालवानी, दीपाताई लालवानी, अशोकजी लालवानी, भाजपा उत्तर नागपूर अध्यक्ष श्री. संजय चौधरी, नगरसेविका सुषमाताई चौधरी, नगरसेविका प्रमिलाताई मंथरानी, सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष वीणाताई बजाज, डिम्पीताई बजाज यांच्यासह बहुसंख्य पदवीधर मतदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संदीप जोशी यांनी उत्तर नागपूरमधील सिंधी हिंदी विद्या समिती, जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालय, कडबी चौक, महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू स्कूल, राजकुमार केवलरामानी हायस्कूल, सेन मायकल हायस्कूल, एसोफेस हायस्कूल, दयानंद आर्य कन्या विद्यालय, गुरूनानक फार्मसी कॉलेज, विनोबा भावे नगर, महर्षी दयानंद नगर, सिंधी हिंदी हायस्कूल, एसीएस गर्ल हायस्कूल, पूर्व नागपूरमध्ये स्वामी सितारामदास विद्यालय, प्रितम भवन, गोरोबा कुंभार सभागृह वाठोडा, शक्तीमाता नगर हनुमान मंदिर, भारतनगर हिमालय सेलिब्रेशन, डिप्टी सिग्नल, नंदनवन लक्श्मीनारायण मंदिर आदी ठिकाणी प्रचारदौरा केला.
संदीप जोशी हे मागील अनेक वर्षापासून राजकारणात असले तरी त्याच्या आधीपासूनच ते सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांशी जुळले आहेत. आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने अगदी लहानपणापासून ते शिक्षकांचे प्रश्न पाहून आहेत. आता त्या प्रश्नांसह पदवीधरांच्याही प्रश्नांची त्यांना जाण आहेच. त्यासाठी ते आवश्यक ते सर्व कार्य करतील यात शंका नाही. पदवीधर आणि शिक्षकांसाठीच्या अनेक महत्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात, त्याबाबत करावयाच्या कार्याच्या संदर्भात त्यांची सभागृहात मदत होईल, हा विश्वासही आहे. त्यामुळे पदवीधरांनी आपला प्रतिनिधी निवडताना त्याची योग्यता आणि कर्तृत्व पाहून संदीप जोशींना साथ द्यावी, असेही आवाहन आमदार नागो गाणार यांनी केले.