नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवून देणार असल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. माझ्या बहिणींचे आहेत. त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू. करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षा बंधनाला पैसे दिले, भाऊ बिजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारावर थांबणार नाही. ते दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला.
दरम्यान काँग्रेस कार्यकर्ता अनिल वडपल्लीतर हा लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेला. वडपल्लीतर आडवाच पडणार आहे. योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेला आहे. हा कुणाचा आहे याची पार्श्वभूमी तपासा. उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय करणार नाही. विरोधकांची याचिका मुंबईत फेटाळली. आता पुन्हा नागपुरात कोर्टात गेले. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. या सावत्र भावांना धडा शिकवा, असे आवाहान करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना केले.