नागपूर: मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) सचिवालयाने नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना सर्वोत्कृष्ट निवडणूक अभ्यास ( 2023) हा पुरस्कार जाहीर केला आहे.
इटनकर यांना सामान्य श्रेणींमध्ये मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी आयोगाने हा पुरस्कार दिला.
दरम्यान डॉ. विपिन इटनकर हे विदर्भातलेच आहेत. ते मूळचे चंद्रपूरचे असून, नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथून त्यांनी एमबीबीएस केले आहे. विद्यानिकेतून येथून बारावीची परीक्षा ८८ टक्क्यांनी उत्तीर्ण केली.
२०१० मध्ये त्यांनी एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एका सरकारी रुग्णालयात नोकरीसाठी ते चंडीगडला गेले. तिथेच त्यांनी यूपीएससीची तयारी केली. पहिल्या तीन प्रयत्नांत त्यांना यश आले नाही. चौथ्या प्रयत्नात मात्र त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत १४ वा क्रमांक पटकावला. २०१४ च्या बॅचचे ते टॉपर आहेत. सध्या ते नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत.