नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा करत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांची निवड केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.
निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला भाकरी फिरवणे म्हणतात असे मला वाटत नाही तर ही निव्वळ धूळफेक आहे, असे फडणवीस म्हणाले. ते नागपूर जिल्ह्ययाच्या दौऱ्यावर असताना रामटेक येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
भाजपने येत्या निवडणुकांसाठी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. फडणवीस नागपूर जिल्ह्यातील विविध मतदार संघात जाऊन विकास कामासंदर्भात आढावा घेत आहे. यादरम्यान ते केंद्र व सरकारच्या योजना सरकार आपल्या दारी योजनेची माहिती, घरकुलाच्या योजना , लोकांचे वैयक्तिक प्रश्न या सर्व विषयावर जनतेशी चर्चा करीत आहेत.
तसेच ते तेथील पदाधिकारी व कार्यकत्यार्शी संवाद साधत आहे. जिल्ह्यातील विकास कामांबाबत अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांना बैठकीत केल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले.