नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरच्या परिवहन व्यवस्थेचा पूर्ण कायापालट करण्याच्या प्रयत्नात आहेत. नागरिकांना स्वस्त, सुविधायुक्त आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी ते सातत्याने काम करत आहेत. याच दिशेने त्यांनी शहरात 18 मीटर लांब आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिका (NMC) सक्रिय झाली आहे. बससाठी मार्ग निश्चित करण्यात आला असून, त्याचबरोबर डिपोचे बांधकामही सुरू करण्यात आले आहे.
2023 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये इलेक्ट्रिक केबल बस सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की नागपूर मेट्रोद्वारे शहराचे चार भाग जोडण्याचे काम सुरू आहे, परंतु ज्या मार्गांवर मेट्रो पोहचू शकत नाही, तिथे बस मेट्रो चालवली जाईल. त्यांनी सांगितले की फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानावर चालणारी 18 मीटर लांब बस शहराच्या इनर रिंगरोडवर चालवण्यात येईल, ज्यामुळे शहराचे वेगवेगळे भाग एकमेकांशी जोडले जातील.
महापालिकेने डिपोचे काम सुरू केले-
केंद्रीय मंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला मूर्त रूप देण्यासाठी नागपूर महापालिका जोमाने काम करत आहे. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यात डिपोचे बांधकाम आणि बसच्या संचालनाचा समावेश आहे. डिपोच्या बांधकामासाठी 31 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असून, याच निधीतून कामाला सुरुवातही झाली आहे. हे डिपो वाडी येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या तीन एकर जागेत उभारण्यात येत आहे.
पारडी ते हिंगणा मार्गावर धावणार बस-
नितीन गडकरींनी घोषित केल्यानुसार, ही बस सेवा शहराच्या इनर रिंगरोडवर सुरू होणार आहे. सुरुवातीला पारडी ते हिंगणा दरम्यान पहिली बस चालवण्यात येणार आहे. 18 मीटर लांबीच्या आणि 57 प्रवाशांच्या आसनक्षमतेच्या या बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक असतील. मनपा आयुक्तांनी सांगितले होते की, एकूण 28 बसांचा ताफा असेल, त्यापैकी 25 बस रस्त्यावर धावतील आणि 3 बस राखीव ठेवण्यात येतील. तसेच दर 10 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, तेथे बस फक्त दोन मिनिटांत चार्ज होईल. ही बस सेवा दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील.