a
नागपूर : कळमना पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दशरथ नगर गांजा रोड येथील एका इलेक्ट्रिक पोलला भीषण आग लागल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली. परिसरातील नागरिकांनी तडकाफडकी या घटनेची माहिती एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना दिली. मात्र अधिकाऱ्यांनी नागरिकांशी अरेरावी करत जळत आहे तर जळू द्या असे प्रत्युत्तर दिले. यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
कोणत्या गरिबांचे दोन -तीन महिन्याचे बिल थकीत असले तर एमएससीबीचे कर्मचारी त्याठिकाणी बिल कापण्यासाठी जातात. मात्र इतकी मोठी घटना घडली तरी याकडे कमर्चारी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी यासंदर्भात कळमना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. कळमना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यानंतरदेखील एमएससीबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले नव्हते. या घटनेनंतर एमएससीबीच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.