नागपूर: कन्हान परिसरात महावितरणच्या साहित्यांच्या चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकणी चालू वाहिन्यांवररील वीज उपकरणावर आपला जीव धोक्यात घालून चोरटे हात साफ करीत असल्याच्या घटना महावितरणच्या निदशर्नास आल्या आहेत. या प्रकरणी महावितरणकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात चोरीच्या ३ घटना उघडकीस आल्या आहेत. सत्रापूर-सिहोरा या कन्हान नगर परिषदेच्या भागात महावितरणचे साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. दिनांक २० मार्च रोजी महावितरणची चमू खंडेलवाल फेरो अलॉयस या उच्च दाब वीज ग्राहकाचे मीटर रिडींग घेण्यासाठी गेली असता मीटर कक्षाची पूर्णपणे नासधूस करण्यात आली होती तसेच येथील मीटर आणि केबल चोरटयांनी लंपास केले होते. यानंतर दुसरी घटना २३ मार्च रोजी घडली. चोरटयांनी यावेळी ११ के.व्ही. जिवंत एक्सप्रेस वाहिनीवरील असलेला वीज खांब जमिनीपासून कापून नेला. या मोठ्या घटनांसोबतच महावितरणच्या वतीने या परिसरात लावण्यात आलेल्या वितरण पेट्यावरील झाकणे, नट-बोल्ट,रोहित्रातील तांब्याच्या तारा,तेल यासारखे साहित्य चोरटे आपला जीव धोक्यात घालून लंपास करीत आहेत.
महावितरणचे साहित्य चोरटे लंपास करीत असल्याने या परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी वीज ग्राहकांच्या रागाला स्थानिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सामोरे लागावे लागते आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच कन्हान उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन कांबळे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार केली. कन्हान पोलिसांनी भादंवि कलम ३७९ अंतर्गत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपस सुरु केला आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांना विनम्र आवाहन करण्यात येते कि आपल्या भागात महावितरणच्या उपकरणाशी छेडछाड करतांना कोणी आढळ्यास त्वरित महावितरणच्या जवळच्या कार्यालयात संपर्क साधावा.