नागपूर: राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे. महावितरणकडून विदर्भातील ११ जिल्ह्यात ही योजना राबवण्यात आली होती.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यन्त राज्यात ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्ररेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या २३ जिल्हयांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना दि. ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट दि. १ मे २०१८ रोजीच पूर्ण केले असून या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वातप्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे. विदर्भातील अकोला ४१०, अमरावती ७३५, भंडारा २४४, बुलढाणा ५६५, चंद्रपूर ७४४, गडचिरोली १०९२, गोंदिया ५९, नागपूर १०७, वर्धा ५, वाशीम ४२६ यवतमाळ ७८८ इतक्या वीज जोडण्या देण्यात आल्या.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) श्री. दिनेशचंद्र साबु, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) श्री. प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना मागील 16 दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात दुर्गम व संवेदनशील अशा गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण 8, गोंदिया जिल्ह्यातील 3 गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्हयातही वीजजोडणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.